बादशाह आणि बिरबल

बादशाह आणि बिरबल चौरस खेळत बसले होते. गप्पांचा विषय वळत वळत खोटं बोलण्यावर आला. बादशहा म्हणाला, झूठबद्दल मला नफरत आहे. कितीही मोठं नुकसान होणार असेल किंवा कितीही जवळची व्यक्ती दुखावणार असेल तरी सत्याची कास सोडू नये. बिरबल म्हणाला, ‘कधी-कधी खोटं बोलावं लागतं’ ते मानायला बादशहा तयार होईना. तेवढय़ात शाही सुवर्ण कारागीर दागिने घेऊन आला. धाकटय़ा बेगमच्या माहेरी लग्न होतं त्यासाठी हे दागिने करायला टाकले होते. धाकटी बेगम अत्यंत तापट स्वभावाची होती. दागिने हाताळताना बादशहाच्या हातून एका कर्णफुलाची तार तुटली. कारागिराकडे ते दागिने परत पाठविण्याएवढा वेळ नव्हता. बादशहाने ते दागिने तसेच बेगमकडे पाठवून दिले. बेगम माहेरी लग्नासाठी गेली आणि तिनं अलंकाराचा डबा उघडला तर कर्णफुलाची तार तुटलेली होती. बेगमनं बादशहाला निरोप पाठविला, ‘‘हे दागिने घडविणाऱ्या कारागिराला जोवर फाशी दिलं जाणार नाही, तोवर मी माहेरी परतणार नाही.’’ बादशहानं बेगमला लगेच निरोप पाठविला आणि ती तार आपल्याच हातानं तुटली होती, असा खुलासा केला. त्यावर बेगमनं लेखी निरोप धाडला, ‘‘एका क्षुल्लक कारागिराला वाचविण्यासाठी खाविंदानंी झूठचा आश्रय घ्यावा हे काही शोभणारं नाही.’’ बादशहा हवालदील झाला. बेगमला समजावणं कठीण होतं आणि एका माणसाचा नाहक बळी घेणं तर त्याला अजिबातच मान्य नव्हतं. अखेर त्यानं बिरबलावरच सगळं सोपविलं आणि म्हणाला, ‘सत्य सांगून काही उपयोग होत नाही, तूच सांग आता काय करू?’ बिरबल म्हणाला, ‘झूठचा आसरा घ्या.’ बादशहा जरा अनिच्छेनंच राजी झाला आणि म्हणाला, ‘सांग काय करू!’ ‘बेगमला निरोप पाठवून द्या, कारागिराला फाशी दिलं, आता परत नांदायला या!’ बादशहानं बिरबलावर विसंबून असत्याची कास धरली. बेगम राजधानीत परतली आणि सरळ त्या कारागिराच्या घरी पालखीचा मोर्चा वळवला. बिरबलाला हे अपेक्षितच होतं म्हणून तो बादशहाला घेऊन लगबगीनं तिकडे गेला. बेगम तिथे पोहोचली तर कारागीर जिवंत होता. त्याला पाहून बेगमनं बादशहाकडे रागाचा कटाक्ष टाकला. बिरबल म्हणाला, ‘‘राणी सरकार, आपला गैरसमज होतो आहे. हा तो कारागीर नसून त्याचा जुळा भाऊ आहे.’’ बादशहानं चमकून बिरबलाकडे पाहिलं व मनातल्या मनात म्हणाला, ‘झूठ!’ बेगमचा पारा जरा खाली येत होता, तोच घरातून कारागिराची बायको बाहेर आली. तिच्या कपाळावर कुंकू पाहून बेगमनं बिरबलाकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. बिरबल म्हणाला, ‘‘लग्नानंतर वर्षभरात पतीचं निधन झालं आणि त्याचा धाकटा भाऊ अविवाहित असेल तर २४ तासाच्या आत विधवेचं लग्न लावण्याची प्रथा आहे यांच्यात.’’ बादशहा मनात म्हणाला, ‘अरे लेका, किती खोटं बोलशिल?’ बेगम पालखीत बसून निघून गेली. कारागीर बिरबलाच्या पाया पडला आणि बादशहानं बिरबलाचं म्हणणं मान्य केलं, ‘तू जगातला सर्वात बुद्धिमान मनुष्य आहेस’ बिरबल म्हणाला, ‘खाविंद तुम्ही आता झूठ बोलण्यात चांगलेच तरबेज झालात की!’ यावर बादशहानं नेहमीप्रमाणं त्याला मिठीत घेतलं!

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :